भाजीपाला घरपोच मिळणार ! काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा - कृषिमंत्री
भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुंबई : भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजीपाला आणि अन्नधान्याचा काळाबाजार केला तर कठोर कारवाई करु, त्यासाठी पोलिसांकडे तक्रार करा, अन्यथा थेट मला फोन करा, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांचा कृषिमाल थेट कॉलनीमध्ये उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन केल्यानंतर शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यात अडचणी येत आहेत. तर भाज्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. याबाबत बोलताना कृषिमंत्री म्हणाले, काळाबाजार होत असेल किंवा वाढीव दरानं विक्री केली जात असेल तर कठोर कारवाई करून जेलमध्ये पाठवलं जाईल. याबाबात तक्रार करण्यासाठी जिल्हा अधिकारी आणि पोलिसांनी कक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे तिथे तक्रार करावी किंवा मला संपर्क करू शकता.
भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न
भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्यानं बाजारपेठेऐवजी रेशन दुकानं किंवा कॉलनीमध्ये थेट माल कसा देता येईल याबाबत विचार सुरु आहे. याबाबत सूक्ष्म नियोजन केलं जात असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक आणि पणन विभागाची समिती गठीत केली आहे, अशी माहिती कृषिमंत्री भुसे यांनी दिली. नोंदणी करून घरपोच फळे आणि भाजी पुरवण्याचाही प्रयत्न आहे. त्यासाठी उबर, स्विगीचा वापर केला जाईल, असं भुसे यांनी सांगितलं.
शेतीसाठी लागणारे बी-बियाणे खते असो की शेतकऱ्याचा कुठलाही भाजी विक्री असेल किंवा निर्यात असेल त्याची व्यवस्था करण्याविषयी नियोजन करण्यात आलं आहे. एक ते दोन दिवसात याविषयी अंमलबजावणी होईल, अशई माहिती भुसे यांनी दिली.
शेतकऱ्यांचं वाहन कुठेही अडवलं जाणार नाही. देशपातळीवर नाशिकचा शेतमाल मुंबई असो की दिल्ली असो, सर्व ठिकाणी जाण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्टिकर वितरित केले जाणार आहेत, त्यामुळे शेतमालाची वाहतूक सुरळीत सुरु राहील, असं कृषिमंत्री म्हणाले.
द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे. तसंच कापूस वेचणी बाकी असल्यानं कापूस खरेदीही आवश्यक आहे. याबाबत नियोजन सुरु आहे. शासकीय दरानुसार कापूस खरेदी केली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.