शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडला विचारू- काँग्रेस
मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई: राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून विचारणा झाल्यास काँग्रेस त्याविषयी नक्कीच विचार करेल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्हाला शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास आम्ही दिल्लीत हायकमांडला विचारू. यानंतर काही पर्याय निघतो का, हे आम्ही पाहू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये तशी अधिकृत चर्चा झालेली नाही.
दरम्यान, गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सत्तास्थापन करण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. मला कशाचीही घाई नाही. मी आरामात बसलोय. मात्र, सत्तेसाठी काहीही वेडेवाकडे करणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले होते.
तर दुसरीकडे शरद पवार यांनीही शिवसेनेच्या साथीने सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शिवसेना आमच्याकडे मदत मागणार नाही. त्यामुळे आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी आमचा पाठिंबा मागण्याचा विषय चर्चेला येणारच नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये चांगले अंडरस्टँडिंग आहे. भाजप ते मोडणारही नाही. कारण, शिवसेनेची साथ सोडणे भाजपला महागात पडेल, असेही यावेळी पवारांनी सांगितले होते.