IFSC चा विषय देसाईंनी एकदाही कॅबिनेटमध्ये काढला नाही- तावडे
राष्ट्रवादीच्या नादाला लागून देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलतोय असा तावडेंचा टोला
दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत व्हावं यासाठी आपण दोनदा कॅबनेटमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला होता पण त्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत केला होता. मात्र सुभाष देसाई यांचा हा दावा खोटा असून त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत हा विषय काढला नसल्याचा आरोप भाजप नेते विनोद तावडे यांनी केला आहे.
हे वाचा : ...तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं- सुभाष देसाई
मंत्रीमंडळ बैठकीत दोनदा IFSC बाबत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केल्याचा सुभाष देसाई यांनी झी २४ तासशी बोलताना दावा केला होता. मात्र देसाई यांनी एकदाही मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय काढला नसल्याचा विनोद तावडे यांनी म्हटले आहे. मी ९९ टक्के मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित होतो, त्यांनी एकदाही हा विषय काढला नाही असे तावडे म्हणाले.
अजेंड्यावर नसलेला एखादा विषय शिवसेनेच्या मंत्र्याने मंत्रीमंडळ बैठकीत काढला की ते लगेच पत्रकार परिषद घेऊन बातम्या छापून आणायचे, हे मात्र कधी छापून आलं नाही. राष्ट्रवादीच्या नादाला लागून देसाई खोटं का बोलतायत ? असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला.
मंत्रीमंडळ बैठकीत उद्योग खात्याचा विषय असला तरच देसाईंचं लक्ष असायचे, नाहीतर इतर विषयाकडे त्यांचं लक्ष नसायचं असा टोला देखील तावडेंनी लगावला.
देसाईंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिली असली तर पुरावे द्यावे. नुसतं हवेत कशाला बोलता ? असा प्रश्न विचारत, देसाई साहेब आपलं हे वागणं बरं नव्हे असे तावडे म्हणाले.
कोरोनात राज्य सरकार काही करू शकलं नाही म्हणून मुंबईच्या अस्मितेचा विषय राष्ट्रवादीचे नेते चालवतायत आणि त्यांच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला हे अत्यंत वाईट असल्याचे तावडेंनी म्हटले.