मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवेचं केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्याचा मुद्दा आता सर्व पटलांवर तापू लागला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टीका केल्यानंतर आता त्यांचा उल्लेख करत मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आदरणीय सुभाष देसाई साहेब, प्रस्तावित #IFSC मुख्यालय मुंबईहून गुजरात-गांधीनगरमध्ये नेण्याची प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाही', असं म्हणत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदी आले त्याचवेळी "मुंबईत #IFSC"चं महाराष्ट्राचं स्वप्न भंगल, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 


'५ वर्षं भाजपासोबत शिवसेनेचं सरकार होतं. भाजपसोबतच्या सरकारमध्येही तुम्ही राज्याचे उद्योग मंत्री होता. या काळात #IFSC मुख्यालय गुजरातला न जाता महाराष्ट्रात राहावं, यासाठी आपण स्वतः आणि आपल्या पक्षाने- शिवसेनेने किती वेळा आवाज उठवला? त्यासाठी कोणता प्रशासकीय पाठपुरावा केला?', असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले. 


महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याची माहिती एकदा या महाराष्ट्राला समजू द्या, असा कटू आणि आग्रही सूर त्यांनी या पोस्टमधून आळवला. 


 


दरम्यान, सध्या हा संघर्ष धुमसत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टीकाही केली आहे. केवळ नाव दिल्याने कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होत नसते. IFSC हे नाव घेतले म्हणून गांधीनगरला ते वित्तीय सामर्थ्य मिळणार नाही. जागतिक आर्थिक केंद्र मुंबईची ताकद राहीलच, ती शक्ती फक्त मुंबईतच आहे हे जग जाणते अशी टीका सुभाष देसाई यांनी केली होती ज्यानंतर हा मुद्दा आणखी पेटला.