IIT टेकफेस्टमध्ये सहभागी होतोय `नटसम्राट` रोबो!
`रोबो थेस्पियन` नावाचा हा रोबो जगातली पहिला अभिनेता रोबो आहे
मुंबई : माणसाच्या अभिनय गुणाला आता आव्हान निर्माण झालंय. हे आव्हान निर्माण केलंय माणसानंच बनवलेल्या रोबोनं.... पुढच्या महिन्यात मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये नटसम्राट रोबो सहभागी होतोय.
रोबो आता माणसाची जागा घेऊ लागलाय. तो कारखान्यात काम करतो. तो हॉटेलमध्ये वेटरचंही काम करु लागलाय. आता हाच रोबो अभिनयही करणार आहे. 'रोबो थेस्पियन' नावाचा हा रोबो जगातली पहिला अभिनेता रोबो आहे. 'थेस्पियन'समोर कसलेल्या अभिनेत्याचा अभिनयही फिका पडेल.
'थेस्पियन'ची उंची ५ फूट ९ इंच एवढी आहे. त्याचा वावर माणसासारखा आहे. समोर पुरुष आहे की स्त्री हे तो सहज ओळखतो. त्याची हिरोगिरी तर पाहण्यासारखी असते. स्क्रिप्टप्रमाणं तो डायलॉग डिलिव्हरी करतो. डायलॉगप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर हावभावही असतात. तो उत्तम डान्सर आहे. गाणंही अप्रतिम गातो. त्याला ३० भाषा बोलता येतात. ७० आवाजही तो काढतो. मुख्य बाब म्हणजे तो उत्तम नकलाकार आहे.
यापूर्वी सोफियानं सगळ्यांनाच इंप्रेस केलं होतं. आता थेस्पियनची जादू आपल्याला पाहायला मिळणार आहे. जगभरात स्टेज शो करणारा हा थेस्पियन भारतात येणार आहे.
'आयआयटी टेकफेस्ट'मध्ये या रोबोला निमंत्रित करण्यात आलंय. मुंबईत थेस्पियन आल्यानंतर बॉलिवूडकरांच्याही नजरा त्याच्यावर असतील. येत्या काळात तो एखाद्या हिंदी सिनेमातही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता त्याला बॉलिवूड कोणत्या सिनेमात ब्रेक देणार याची उत्सुकता आहे.