मुसळधार पावसाचा इशारा दिलाच नव्हता; हवामान खात्याचे मध्य रेल्वेला प्रत्युत्तर
पावसाच्या अंदाजावरून हवामान खाते आणि मध्य रेल्वेमध्ये जुंपली
मुंबई: मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे बुधवारी मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवायचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. यावरून मध्य रेल्वेच्या कारभारावर पुन्हा एकदा टीकेची प्रचंड झोड उठली. या सगळ्या प्रकारानंतर रेल्वेने हे वेळापत्रक रद्द केले. मात्र, मध्यंतरीच्या काळात प्रचंड गोंधळ झाला होता. त्यामुळे रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवायचा निर्णय घेतलाच का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावर रेल्वे प्रशासनाकडून मुसळधार पावसाच्या अंदाजाचे कारण पुढे करण्यात आले.
मात्र, बुधवारी संध्याकाळी भारतीय हवामान खात्याचे (IMD) संचालक के. एस. होसाळीकर यांनी आम्ही असा कोणताही इशारा दिला नसल्याचे ट्विटरवरून सांगितले. ३ जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस होणार नाही, हे आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना आधीच कळवले होते. हवामानाच्या माहितीसाठी त्यांनी IMD च्या संकेतस्थळाला भेट द्यायला हवी, असा अप्रत्यक्ष टोला होसाळीकर यांनी लगावला होता. त्यामुळे मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्याने सकाळी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे पाऊस नसूनही प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. दरम्यान, मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान गर्दीमुळे एका महिलेसह तिघे प्रवाशी लोकसमधून पडल्याच्या घटना घडल्या. दुपारपर्यंत मुसळधार पाऊस न पडल्यामुळे रेल्वेच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती. अखेर दुपारी मध्य रेल्वेने हे वेळापत्रक रद्द केल्याचे जाहीर केले. त्यावेळी रेल्वेने ट्विटरवर हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून आपली बाजू स्पष्ट केली.