दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या लढ्यात इतरांनी शासनाला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत मागील तीन दिवसात १३ हजार लोकांनी राज्य सरकारकडे यासाठी अर्ज केले आहेत. निवृत्त लोकांनी यासाठी अर्ज करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. तरीही सध्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही यासाठी अर्ज केले आहेत. यात डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट यासह शिक्षक, आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनीही अर्ज केले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त नर्स, वॉर्डबॉय अशा प्रशिक्षित लोकांची राज्य सरकारला सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गरज आहे. त्यामुळे काम करण्याची इच्छा असलेल्यांनी राज्य सरकारशी Covidyoddha@gmail.com या ई मेलद्वारे संपर्क करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ('लॉकडाऊन नसतं तर कोरोनाबाधितांची संख्या ८.२ लाखांवर') 



 मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळात आहे. राज्य सरकारकडे  पहिल्या तीन दिवसात 12900 अर्ज इ मेलद्वारे आले आहेत. या सर्व लोकांना सरकारकडून आणखी एक अर्ज भरून पाठवण्यासाठी मेल करण्यात आला. हा दुसरा अर्ज ९ हजार ५६ लोकांनी भरून पाठवला आहे. 34 जिल्ह्यातून यासाठी अर्ज आले असून यात सर्वाधिक अर्ज मुंबईतून आले असून त्याखालोखाल पुण्यातून अर्ज आले आहेत. 


आतापर्यंत आले एवढे अर्ज 


नर्स - 2519
फार्मासिस्ट - 761
डॉक्टर - 593
सामान्य स्वयंसेवक - 554 
सामाजिक कार्यकर्ते - 553
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 541
वॉर्ड बॉय - 486
पॅरामेडिक - 452
इतर वैद्यकीय व्यावसायिक - 379
आयटी क्षेत्रातील कर्मचारी - 165
शिक्षक - 161
संरक्षण सेवा - 147 
सुरक्षा रक्षक - 146
सैन्य वैद्यकीय संस्था - 75 
इतर - 1581