मुंबई : आधी शासकीय कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, मग जेष्ठ नागरिक, त्यानंतर १८ ते ४५ वयोगट यांना कोरोनावरील उपयुक्त लस देण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा धोका ओसरला. मात्र, तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या लाटेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आज ३ जानेवारीपासून देशभरासह राज्यातही लहान मुलांच्या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ झाला. 


राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी बीकेसीतील जंब्मो कोविड सेंटरमध्ये मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅेड. सुहास वाडकर, आमदार झिशान सिद्दीकी, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, ‘बीकेसी’ सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे आदी उपस्थित होते.


ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे नोंदणी करून लस घेता येणार आहे. पुढील २८ दिवसांत ९ लाख २२ हजार ५१६ मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.


तनुजा माकडवाला ठरली पहिली मानकरी
महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर शाळेची दहावीतील विद्यार्थिनी तनुजा माकडवाला हिला मुलांच्या लसीकरण मोहिमेतील पहिली लस घेण्याचा मान मिळाला. यानंतर हेमंत बारी या मुलीने लस घेतली. यावेळी दोन्ही मुलींना प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.


२००७ आधीचा जन्म हवा
पालिका शाळेचे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांना ही लस मोफत दिली जाणार आहे. यासाठी २००७ किंवा त्याआधीचा जन्म असणे आवश्यक आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी परळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यात आली आहे. 


दरम्यान, मुंबईसह राज्यात १६ जानेवारी २०२१ पासून १८ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आतापर्यंत पहिला डोस ९८ लाख तर दुसरा डोस ८७ टक्के पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत १ कोटी ८० लाख डोस देण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२२ पर्यंत लसीकरणाच्या दोन्ही मात्रा देण्याचा शंभर टक्के टप्पा पार करण्याचे पालिकेचे उद्दीष्ट आहे.