राज्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ
१३ ठिकाणी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील मुलांना मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शाळा स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली होती. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापैकी पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या १३ ठिकाणी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार आहेत. याचबरोबर राज्यात आंतरराष्ट्रीय मानकं असणाऱ्या या शाळांच्या संलग्नतेसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळामार्फत सुरु करण्यात येणा-या शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे.