मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५२ वर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात नवे १२० रूग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे नवे ६८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२६ वर गेला आहे. तर सोमवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला.  तर नागपुरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे  ६८ वर्षीय व्यक्तीचं मेयो रुग्णालयात निधन झाले. मृताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. तर बुलढाण्यात दोघे तर बारामतीत एक जण कोरोनाबाधित सापडला आहे.


नागपुरात पहिला बळी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका ६८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्याचा मृत्यू झाला. मात्र सोमवारी रिपोर्ट आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती हाती आली. श्वास घेण्याच्या तक्रारीमुळे त्या व्यक्तीला मेयोमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा पोलीस आता शोध घेत आहेत. 


पुण्यात अनेक ठिकाणी सील


बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता  ११ वर येऊन पोहोचलीये त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या या संख्येमुळे यंत्रणेसमोर  मोठं आव्हान उभं  राहिले आहे. दरम्यान,  पुण्यातील भवानी पेठ नाना पेठ आणि मंगळवार पेठेत टाळे बंदी करण्यात आली आहे. गुल टेक़डीचा परिसरही सील  करण्यात आला आहे. पुण्यामध्ये एकाच दिवसात ३७ रुग्ण पॉझिटीव्ह, शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०० च्यावर तर जिल्ह्यात सुमारे १५० रुग्ण झाले आहेत. 


बारामतीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. बारामतीतल्या कोरोना रुग्णांची संख्या २ वर पोहोचली आहे. फळ विक्रेत्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश आले आहेत. 'भाजीपाला, फळे , चिकन दुकानं बंद ठेवा', असे आदेश देण्यात आले आहे. बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.


सांगलीत आणखी एक रुग्ण


 सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एका नव्या रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. इस्लामपूरमधील त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या एका महिला रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेला इन्स्टिट्यूट कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आलं होतं. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आत्ता २२ वर पोहचली आहे.


साताऱ्यात चार जण


सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा चारवर पोहचला आहे. त्यापैकी एका संशयितांचा  मृत्यू झाला आहे.कॅलिफोर्निया वरून आलेल्या या ६३ वर्षाच्या व्यक्तीचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि  १४ दिवसांनंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.  त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


धुळ्यात किटचा तुटवडा


धुळ्यात कोरोना तपासणीसाठी किटचा तुटवड्याची बातमी झी २४ तासनं दाखवल्यानंतर सरकारी चक्र वेगानं फिरली. दोन दिवसात एक हजार तपासणी किट प्रयोगशाळेत येणार असल्याचं धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. तसंच झी २४ तासचे आभारही मानले. प्रयोगशाळेत धुळ्यासह जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा येथील नमुन्यांची तपासणी करण्यात येतेय.


औरंगाबाद उद्योजकांना यश


राज्यात व्हेंटीलेटरचीही अत्यंत कमतरता आहे, त्यासाठीच मदत म्हणून औरंगाबादेत उद्योजकांनी एक ब्रीदिंग असीस्टंट मशीन तयार केले आहे. हे मशीन व्हेंटीलेटर सारखीच काम करते. यामुळे अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांसाठी व्हेंटीलेटर राखून ठेवता येईल, असा दावा करण्यात आला आहे.


वर्धा येथे भाजी, फळ विक्रेत्यांची आरोग्य तपासणी


वर्धा शहरात भाजी आणि फळ विक्रेत्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या विक्रेत्यांचा लोकांशी थेट संपर्क येतो, म्हणून अशी तपासणी करण्यात आली. त्यासाठी २१ आरोग्य पथकांकडून शहराच्या विविध भागांत ही मोहीम राबवण्यात आली. तपासणी दरम्यान ४२ विक्रेत्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येतायत.