राणेंशी पंगा घेतल्यामुळे दीपक केसरकरांच्या अडचणीत वाढ? मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलीये. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसतात. यामुळे राणे आणि केसरकर यांच्यात वाद पेटला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
केसरकर यांनी भाजप आणि शिंदे गटात दुरी निर्माण होईल, अशी विधानं करू नयेत, अशी ताकीद शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शिंदे गट गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची भक्कम बाजू केसरकर यांनी मांडली होती.
शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये केसरकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची बाजू घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला होता.
केसरकर म्हणाले की, राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता, असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, भाजपचं व्यासपीठ वापरून त्यांनी आदित्य यांची बदनामी केली. यासंदर्भात मी स्वतः मोदी आणि भाजपसोबत संपर्क केला. पंतप्रधानांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम, आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचल्यावर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात संवाद सुरू झाला. यानंतर पंतप्रधान मोदी आणि ठाकरेंची भेट झाली.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी सासवड याठिकाणी झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकरांचं कौतुक केलं. केसरकर यांनी आमची बाजू व्यवस्थित मांडली आणि नंतर मला इतर गोष्टी मांडण्यासाठी वेळ मिळाला. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची बाजू माध्यमांमध्ये आणि जनतेसमोर जोमाने केसरकर यांनी मांडली होती. दरम्यान शुक्रवारी केसरकर यांनी राणेंवर केलेल्या टीकेमुळे ते अडचणीत सापडलेत.