मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात 7975 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज एका दिवसांत राज्यात 233 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 10 हजार 928 जण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के इतका आहे. 


राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना, कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज राज्यात 3606 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 1 लाख 52 हजार 613 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 55.37 टक्के इतका आहे.



सध्या राज्यात 1 लाख 11 हजार 801 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात 7,08,373 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 43,315 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. मुंबईतील कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती आहे. मुंबईच्या 24 विभागांपैकी 17 विभागातील कोरोना रुग्णावाढीचा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे. यापैकी काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. सध्या 17 विभागांमध्ये 1.34 टक्क्याच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. तर उर्वरित सात विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर 2.5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.