लसीचे दोन डोस घ्या, बक्षीस मिळवा! तुम्हीही ठरू शकता विजेते, कसं ते पहा
लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ काढण्याच्या विचारात आहे
मुंबई : देशात कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. लसीचे डोसही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पण अजूनही अशी काही क्षेत्र आहेत, जिथे लसीकरणाने अजूनही वेग घेतलेला नाही. या भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकार एका योजनेवर विचार करत आहे.
लकी ड्रॉ काढणार
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ काढण्याच्या विचारात आहे. लसीकरणाचा वेग वाढवून टार्गेट पूर्ण करण्याचा उद्देश यामागे आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी लकी ड्रॉचा विचार केला जात आहे, ज्यामुळे लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहन मिळेल.
लसवंतांना मिळणार ही बक्षिसं
लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लसवंतांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसं देण्याचा विचार आहे. यात स्वयंपाकघराशी संबंधित उपकरणं, रेशन किट, प्रवास पास, रोख बक्षिसे दिली जाऊ शकतात. याबाबत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश लवकरच सूचना देण्याची शक्यता आहे.
लसीकरणासाठी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उपायावरही सरकार विचार करत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या योजनेसाठी अॅम्बेसेडरचीही नियुक्ती केली जाऊ शकते. याशिवाय 'हर घर दस्तक' मोहिमही सुरु केली जाणार आहे.
आतापर्यंत किती टक्के लसीकरण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशातील सुमारे 82 टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर देशातील साधारण 43 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देणअयात आले आहेत. पण 12 कोटीहून अधिक जण असे आहेत ज्यांना दुसरा डोस घेण्यात विलंब झाला आहे.