मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी !
Navi Mumbai Property Tax : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी. आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळणार आहे.
Navi Mumbai Property Tax : नवी मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईच्या धर्तीवर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबईत विविध मालमत्तेसाठी NMMC मालमत्ता कर देखील भिन्न आहे. तुमचा NMMC मालमत्ता कर तुमची निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता आहे की नाही यावर आधारित असतो. तुम्ही नवी मुंबईत मालमत्ता खरेदी केल्यास , तुमची मालमत्ता NMMC च्या अधिकारक्षेत्रात येते. त्यानंतर त्यावर मालमत्ता कर लागू होतो.
मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली.
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत नऊ झोन समाविष्ट आहेत. यात ऐरोली, बेलापूर, दहिसर मोरी, दिघा, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, तुर्भे आणि वाशी यांचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय झाला तर या भागात 500 चौरस फुटांच्या मालमत्ताधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील प्रकल्प प्रभावित घरांसाठी मालमत्ता कर दंड वसुलीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने PAPs (प्रकल्प प्रभावित व्यक्ती) निवासी मालमत्तांसाठी मालमत्ता कर दंड वसूलीचा निर्णय तात्काळ स्थगित ठेवला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या मालकांकडून मालमत्ता वसुली करण्यावर भर देण्यात आला होता. राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतरच प्राधिकरण पुढील निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला या मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर दंड माफ करण्याची मागणी करण्यात येत होती.