मुंबई : नाटककारांचं संमेलन, दिवाळी अंकांमधील लेखकांचं संमेलन असे हटके उपक्रम राबवणारे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी नवा उपक्रम सुरु केला आहे. कला जिवंत ठेवणाऱ्या, नाट्यसृष्टीशी नातं जपणाऱ्या, वयामुळे घरीच असलेल्या आणि लोकांच्या दृष्टीने काहीशा विस्मृतीत गेलेल्या ज्येष्ठ नाट्य कलावंतांच्या भेटीगाठींची ही अभिनव संकल्पना कौतुकास्पद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात सारं काही ठप्प झालेलं असताना एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांच्या भेटी घेण्याच्या या उपक्रमांतर्गत नुकतीच ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे, बाळ कर्वे यांच्या घरी जाऊन अशोक मुळ्ये यांनी त्यांची भेट घेतली. सोबत होते रंगभूमीचे एव्हरग्रीन स्टार प्रशांत दामले.


चिमणरावांच्या मालिकेत गुंड्याभाऊंची भूमिका अजरामर करणारे बाळ कर्वे यांच्या घरी जाऊन अशोक मुळ्ये आणि प्रशांत दामले यांनी गप्पांचा फड जमवला. बाळ कर्वेंना या भेटीने गहिवरुन आलं. सध्याच्या काळात फार कुणी संपर्क करत नसताना तासभर झालेल्या या खेळीमेळीच्या वातावरणातील गप्पांवेळी बाळ कर्वे रंगभूमीवरच्या जुन्या आठवणीत रमून गेले होते. 


अशोक मुळ्ये आणि प्रशांत दामले यांनी भारदस्त आवाजाचे धनी सुनील शेंडें यांच्या घरीही भेट दिली. या अचानक भेटीनं सुनील शेंडे यांच्याबरोबरच त्यांचं कुटुंबियही आनंदुन गेलं. 



पुढेही अशा अनेक ज्येष्ठ नाट्य कलावंतांशी भेटीगाठी घेण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा अशोक मुळ्ये यांचा मानस आहे. नाट्य संमेलनाचं हे 100 वं वर्ष आहे. कोरोना काळात मोठे महोत्सवी कार्यक्रम होणं शक्य नसल्याने नाट्यसृष्टीला वंदन करण्याचा, त्याचं ऋण व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून अशोक मुळ्ये यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.