मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता हळहळू उफाळत आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र वरळी येथे दिसून आले. किशोरी पेडणेकर समर्थक गट आणि राजेश कुसळे गट आमने-सामने आलाय. मात्र, पेडणेकर गटाने वर्चस्व निर्माण केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळी विधानसभा शिवसेनेतील वादात अखेर किशोरी पेडणेकर समर्थक गटाची सरशी झालीय. शाखा क्रमांक १९९ चा पदभार नवनियुक्त शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी स्वीकारलाय. राजेश कुसळे विरुद्ध किशोरी पेडणेकर असा वाद निर्माण झाला होता. 


शाखाप्रमुख पदावरून हटविल्याने कुसळे समर्थक संतप्त झाले होते. गोपाळ खाडे यांच्या नेमणुकीला विरोध करत त्यांना शाखेत येण्यापासून कुसळे समर्थकांनी अटकाव केला होता. अखेर गुरुवारी संध्याकाळी स्थानिक  नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत खाडे यांनी शाखेत प्रवेश केला. 


नव्या नियुक्त्यांवरुन वरळी शिवसेनेत असंतोषाचा स्फोट झाला होता. विभागप्रमुख आणि नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्यावर एका गटाचा रोष होता. जोवर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नव्या नेमणुकीसंदर्भात चर्चा होत नाही तोपर्यंत गोपाळ खाडे यांना शाखेत येऊ देणार नाही, असा पवित्रा कुसळे समर्थकांनी घेतला होता. मात्र अखेर या वादात किशोरी पेडणेकर समर्थकांचीच सरशी झालीय.