`मला नाही चौकशीलाच क्वारंटाईन केलं`, पटण्याला परतताना एसपी विनय तिवारींचा आरोप
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत.
मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत. मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशीत अडथळा आल्याचा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. पटण्याला परतत असताना विनय तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'त्यांनी मला क्वारंटाईन केलं असं मी म्हणणार नाही, तर त्यांनी चौकशीच क्वारंटाईन केली. बिहार पोलिसांच्या चौकशीमध्ये अडथळे आणले गेले,' असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे.
'मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशी प्रभावित झाली. त्यांनी प्रक्रियेनुसार मला क्वारंटाईन केलं, पण चौकशीत अडचणी आल्या. कोणत्या ना कोणत्या निकालापर्यंत पोहोचायचा आमचा प्रयत्न होता, पण आता ही चौकशी दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत होणार आहे. त्यांची नेमकी इच्छा काय होती, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही,' अशी प्रतिक्रिया विनय तिवारी यांनी दिली.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी बिहारच्या पटण्याचे एसपी विनय तिवारी मुंबईमध्ये आले होते. मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केलं. पोलीस अधिकाऱ्याला अशाप्रकारे क्वारंटाईन केल्यामुळे सुप्रीम कोर्टानेही राज्य सरकारला फटकारलं. अधिकाऱ्याला क्वारंटाईन करणं अव्यवहार्य असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं.
सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने कालच रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर आजच ईडीकडूनही रिया चक्रवर्तीची चौकशी झाली आहे.