मुंबई : सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चीट देण्यात आलेली नसल्याचा पुनरुच्चार राज्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अर्थात लाललुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार आणि एकंदर सिंचन घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली असल्यानं आता अंमलबजावणी संचलनालय (ईडी) या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात इडीने सिंचन घोटाळ्यासंबंधी महत्वाची कागदपत्रे एसीबीकडून मागून घेतली. त्यानतंर एसीबीने सिंचन घोटाळा चौकशीत अजित पवारांना क्लीन चीट दिलीय का? दिली असेल तर कोणत्या आधारे दिली? याचं स्पष्टीकरण इडीने एसीबीला विचारलं होतं.


त्यावर एसीबीने सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना कोणतीही क्लीन चीट दिलेली नाही. अजित पवारांच्या आरोपांचा अजूनही तपास सुरु असल्याचे एसीबीने इडीला कळवलंय. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचं भूत अजित पवारांच्या मानगुटीवरुन उतरेल असं दिसत नाही.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती.


याप्रकरणी काही शासकीय अधिकाऱ्यांना एसीबीने अटकही केली होती. पण अजित पवारांची यामध्ये भूमिका काय आहेत? हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून ईडीने कागदपत्रं मागवली आहे.