मुंबई: काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सडकून टीका केली आहे. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी. काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेल्या या पत्रामुळे आगामी दिवसांत काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्या होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेतृत्त्वबदलाविषयी चर्चा होऊ शकते. 


काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची शक्यता; २३ ज्येष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र

सूत्रांच्या माहितीनुसार, साधारण १५ दिवसांपूर्वी हे पत्र सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, यासाठी पर्यायही सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याचे काय पडसाद उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या पत्रात काँग्रेस पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्त्व मिळावे, असेही सांगण्यात आले आहे. हे नेतृत्त्व लोकांच्या नजरेत राहणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे. भविष्यात पक्षाने एकसंधपणे वाटचाल करण्यासाठी संस्थात्मक नेतृत्त्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.