J J Hospital : शस्त्रक्रिया चोरल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर!
J J Hospital : सरकारकडून डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. अखेर मार्ड डॉक्टरांच्या आरोपांनंतर लहाने यांनी राजीनामा दिला होता.
J J Hospital : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठं सरकारी रूग्णालय म्हणजेच जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनानंतर नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आता सरकारकडून डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर निवासी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास दिल्या जात नाही, असा आरोप केला होता. यानंतर काही निवासी डॉक्टरांनी याबाबत आंदोलन देखील केलं. यावेळी 31 मे रोजी डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत 9 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले. या डॉक्टरांमध्ये डॉ.शशी कपूर, डॉ.दीपक भट, डॉ.सायली लहाने, डॉ.रागिणी पारेख, डॉ.प्रीतम सामंत, डॉ.स्वरांजित सिंग भट्टी, डॉ.आश्विन बाफना आणि डॉ.हमालिनी मेहता यांचा समावेश होता.
डॉ. लहानेंवर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप?
या प्रकरणानंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांची बाजूही मांडली. डॉ. लहाने यांच्या म्हणण्यानुसार, जही रुग्णालय प्रशासनाने आमची बाजू ऐकून घेतली असून निवासी डॉक्टरांना रुग्ण तपासणं आणि त्यांची हिस्ट्री लिहिणं हे कारकुनी काम असल्याचं वाटतं. आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाल्याचं ऐकून मी निराश झालो.
पुन्हा जे.जे रूग्णालयात आम्हाला परतायचं नाही. गरीब रुग्ण शस्त्रक्रियेसाठी आमच्याकडे येतात. गेल्या 36 वर्षांपासून मी त्यांना नवी दृष्टी देण्याचं काम करतोय. आमच्यासमोर त्यांची दृष्टी जाण्यापेक्षा आम्ही राजीनामा दिला. यावेळी आम्ही कोणाच्याही शस्त्रक्रिया चोरलेल्या नाहीत, असंही डॉ. लहाने म्हणालेत.