Jaipur-Mumbai Train Firing: जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यत आहे. ट्रेनमध्ये गोळीबार करणारा मुख्य आरोपी, आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग चौधरीला बडतर्फ करण्यात आले आहे. आरोपी चेतन चौधरी हा यापूर्वीही अनुशासन भंगाच्या किमान तीन घटनांमध्ये सामील होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतनने 31 जुलै रोजी सकाळी पालघर स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील आपले वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीणा आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. ही हत्या त्याने द्वेष भावनेतूनच केल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे. त्यामुळे आरोपीला इतका मत्सर, द्वेष का होता? त्याच्या मनात इतका द्वेष कोणी भरला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एस 6 कोचमधील प्रवाशी अब्दुल कादिरची हत्या केल्यानंतर आरोपी चेतन एस 5 कोचमध्ये गेला आणि त्याने एका महिला प्रवाशावर AK47 गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंगराचेंगरी आणि गोंधळामुळे तो गोळीबार न करता ट्रेनमधून उतरला, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली. 


रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला प्रवाशाचे स्टेटमेंटही नोंदवण्यात आले असून, तिने त्यावेळच्या डब्यातील परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ट्रेनमधून उतरल्यानंतर आरोपी चेतन सिंगने ट्रेनच्या गार्डवर बंदुक ताणली. चेतन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन सिंहने गार्डला बंदूक दाखवताच तो घाबरला आणि परत ट्रेनच्या डब्याजवळ आला.


आरोपी चेतनला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केला होता.  न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी चेतन सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.


RPF तपास पथकाने 31 जुलैच्या घटनेबाबत चौधरीचे सध्याचे आणि माजी सहकारी आणि वरिष्ठांचे जबाब नोंदवून घेतले होते. चौधरीने बुरखा घातलेल्या एका महिला प्रवाशाला धमकावले आणि बंदुकीच्या जोरावर तिला 'जय माता दी' म्हणण्यास भाग पाडले, अशी माहिती  रेल्वे गोळीबाराची चौकशी करणाऱ्या तपासकर्त्यांनी दिली.


या प्रकरणाचा तपास करणार्‍या जीआरपी, बोरिवलीने सदर महिलेची ओळख पटवली आहे आणि तिचा जबाब नोंदवला आहे. यासोबत तिला या प्रकरणातील मुख्य साक्षीदारही बनवले आहे. हा संपूर्ण प्रकार ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.