मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?
ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांची पावलं मुंबईबाहेर पडतात. लांब कुठे तरी कोकणात किंवा गावापाशी रानावनात, बरोबर ना? पण मुंबईतच राहून तुम्हाला हा अनुभव मिळाला तर... असंच मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टीनेशन तुम्हाला दाखवणार आहोत.
मुंबई : ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांची पावलं मुंबईबाहेर पडतात. लांब कुठे तरी कोकणात किंवा गावापाशी रानावनात, बरोबर ना? पण मुंबईतच राहून तुम्हाला हा अनुभव मिळाला तर... असंच मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टीनेशन तुम्हाला दाखवणार आहोत.
मुंबईत पर्यटनाची ठिकाणं म्हटलं तर आपल्यासमोर जुहू चौपाटी, गेट ऑफ इंडिया, राणीचा बाग, नॅशनल पार्क अशी ठिकाणं येतात. सुट्टीच्या दिवशी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते. मात्र, ट्रेक करायचा म्हटलं तर कोकण, नाशिक, कर्जत कसारा आणि गडकिल्ले पर्यटकांच्या समोर येतात. मात्र, हाच अनुभव तुम्हाला मुंबईत अनुभवता आला तर... बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर ट्रेकींग पाँईट आहे. 'जांभुळमाळ कडा' असं या ट्रेकिंग पाँईटचं नाव आहे.
मुंबई समुद्रसपाटीपासून दीड हजार फुटावर असलेला जांभुळमाळ कडा ट्रेकर्सचं आवडीचं स्थान आहे. भटकंती महाराष्ट्राची हा ग्रुप निसर्गाचा अनुभव आणि ट्रेक करण्यासाठी जांभुळमाळ कडा येथे आलाय.
जांभुळमाळ कड्यावर जाण्यासाठी जंगलात वाहणाऱ्या नद्या, धबधबा आणि कडेकपाऱ्यातून रस्ता काढत जावं लागतं. या जंगलातून प्रवास करताना औषधी वनस्पती आणि निसर्गाची माहिती मिळते.
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी गुंफा, टायगर सफारी आणि वनराणीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना जांभुळमाळ कड्याबद्दल तितकीशी माहिती नाही. मुंबईत धावपळीच्या आयुष्यात निसर्ग आणि ट्रेकिंगचा अनुभव घेणं सुखद धक्काच आहे.