मुंबई : गेल्या महिन्यभरातून देश विदेशात कोरोना या संक्रमित साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध यंत्रणांच्या माध्यमातून अथक प्रयत्न चालू आहेत. भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्र सरकार देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व व्यवस्था उपलब्ध करून देत आहे. जीवनविद्या मिशनतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३५ लाखांचा निधी देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी चोवीस तासच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये जीवनविद्या मिशनचे आजीव ट्रस्टी आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाद पै यांनी ही माहिती दिली. सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या तत्वज्ञान नेहमीच राष्ट्रधर्म व राष्ट्रहित यांना प्राधान्य देते. म्हणून गेले अनेक दिवस जीवनविद्या मिशन तर्फे तन-मन-धन रूपात समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 


एवढंच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून जीवविद्या मिशनने कर्जत येथील 'जीवनविद्या ज्ञानपीठ' हे शासनाला विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. जीवनविद्या ज्ञानपीठात नागरिकांसाठी विलगीकरण/ स्वतंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विलीगकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी जेवणाची, राहण्याची, बेड, शौचालय तसेच इत्यादी पायाभूत सुविधा जीवनविद्या मिशनतर्फे विनामूल्य पुरवल्या जात आहे. 


तसेच विश्वकल्याणासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी आणि रक्षणासाठी आरंभिलेल्या विश्वप्रार्थना महाजप यज्ञात सर्व ७५ शाखा आणि केंद्रांच्या माध्यमातून सर्व नामधारक आणि शुभचिंतक यांच्याकडून दररोज घरातूनच एकत्ररित्या जवळपास १ करोड ५० लाखहून अधिक विश्वप्रार्थनांचे योगदान दिले आहे. तसेच दररोज रात्री १० ते ११ या वेळेत एकाचवेळी हजारो नामधार विश्वप्रार्थना बोलून सकारात्मक विचार करतात.