`मुख्यमंत्र्यांच्या शहरात त्यांच्याच पक्षाचा बंद`; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं
Jitendra Awhad : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानांच्या विरोधात ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये बंद पुकारण्याच आला आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना आणि बाळासाहेबांची शिवसेनातर्फे बंदची हाक देण्यात आलीय
Maha Vikas Aghadi Morcha : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन शिंदे - फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात येणार आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षासह इतर संघटना या महामोर्चात सहभागी होणार आहेत. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाजवळील रिचर्डसन क्रुडास कंपनी (Richardson and Cruddas Mill) ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
मात्र दुसरीकडे भाजपही या मोर्चाला माफी मांगो आंदोलनाने प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरुन वक्तव्य करणाऱ्या शिवसेना नेत्यांविरोधात भाजप मुंबईत माफी मांगो आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे ठाणे व डोंबिवलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
पोलीस मात्र हातावर हात ठेऊन बसले आहेत
यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. "हसावे का रडावे कळत नाही... ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात, त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो आणि बळाचा वापर करुन दुकानं, रिक्षा, बस बंद करत आहे. पोलीस मात्र हातावर हात ठेऊन बसले आहेत", असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
कल्याण डोंबिवलीतही बंदची हाक
शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानांवरुन भाजप आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भाजपने मुंबईत माफी आंदोलनाची हाक दिली आहे. तर सुषमा अंधारे यांच्याविरोधात कल्याण, डोंबिवलीत बंद ठेवण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.