होय, शरद पवार जाणता राजाच; आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार
शरद पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे.
मुंबई: शरद पवार यांना देण्यात आलेल्या 'जाणता राजा' या उपाधीवरून उदयनराजे भोसले घेतलेल्या आक्षेपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच आहेत, असे त्यांनी ठासून सांगितले. कारण, शरद पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेती, औद्योगिक वसाहती, नागरी प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न अशी चौफेर जाण शरद पवार यांना आहे. एवढेच नव्हे तर या प्रत्येक समस्येचे उत्तरही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
अनेकजण शरद पवार यांची करंगळी पकडून किंवा त्यांच्यावर केवळ टीका करून राजकारणात मोठे झाले. त्यामुळे आता कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?, असा खोचक सवालही आव्हाडांनी उदयनराजेंना विचारला.
'उद्धवजी राऊतांच्या जिभेला लगाम घाला, मुजोरी खपवून घेणार नाही'
उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक, असा टोला उदयनराजे यांनी पवारांचे नाव न घेता लगावला होता.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. महाशिवआघाडीतील 'शिव' का काढून टाकले, असा सवाल करतानाच महाराजांचे नाव घेत असाल तर त्या प्रमाणे वागा. अन्यथा शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, अशी टीका उदयनराजेंनी केली होती.