मुंबईत या स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार नाही!
मुंबईत गोरेगाव आणि मालाड स्टेशनवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापचे वातावरण आहे. मंगळवारपासून रेल्वे फलाटांवर प्रशासनाकडून उद्घोषणा केल्या जात होत्या.
मुंबई : गोरेगाव आणि मालाड स्टेशनवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापचे वातावरण आहे. मंगळवारपासून रेल्वे फलाटांवर प्रशासनाकडून उद्घोषणा केल्या जात होत्या.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात प्रवासी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी ९ च्या सुमारास प्रवासी रेल्वेच्या या निर्णयाविरोधात निदर्शनं करणार आहेत. विविध माध्यमातून जोगेश्वरी स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे.
गर्दी ही मुंबईसाठी नवी नाही. पण, गेल्या काही काळात मुंबईवरील ताण वाढत असून, रेल्वेही अतिरिक्त प्रवाशांच्या बोजाखाली दबली आहे. त्यात गर्दीतून वाट काढता काढता मुंबईकरांचा जीव मेटाकूटीला येतो. अशा स्थितीत जोगेश्वरीमधील लोकसंख्याही प्रचंड वाढली असून सकाळच्या वेळेला गोरेगाव-मालाड वरून सुटणाऱ्या लोकलवर जोगेश्वरीतील नागरिकांची भिस्त असते.
दरम्यान, फास्ट लोकलला थांबा न देण्याच्या निर्णयामुळे जोगेश्वरीवरुन प्रवास करणा-या प्रवाशांचा हा पर्याय बंद होणार आहे. बोरीवलीवरून येणाऱ्या जलद लोकल ज्या आधीच पूर्ण भरून येतात. त्यामुळे त्यामध्ये चढण्याचा अशक्यप्राय प्रयत्न जोगेश्वरीकरांना करावा लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.