मुंबई : जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. निवडून आल्यापासून शरद सोनावणे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधून घेतलं आहे. मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीआधी सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश व्हावा यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही होते. पण शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांचा याला विरोध होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद सोनावणे यांनी म्हटलं की, खासदार संजय राऊत यांनी जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यामार्फत शिवसेनेत प्रवेश करण्याचे मला निमंत्रण दिले होते. याबाबतची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष ठाकरे यांना दिली होती. मनसे न सोडण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली होती. मात्र ग्रामीण भागात मनसेचा प्रभाव नसल्याने स्थानिक राजकारणात मी कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला शिवसेनेत घेण्यासाठी हालचाली सुरु होत्या.


शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या बुचके यांना आता तिकीट मिळणार की नाही. याबाबत चर्चा आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी मोठ्या मताधिक्‍याने निवडून येईल आणि युतीची सत्ता आल्यास तालुक्याच्या विकासाठी मला पर्यटन मंत्रिपद मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.