मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : राग माणसाला कोणत्या थरावर नेऊ शकतो याचं ताजं उदाहरण धारावीमध्ये पाहायला मिळालं. धारावीत (Dharavi)राहणाऱ्या विमलराज नाडार या कबड्डीपटूची शनिवारी शुल्लक कारणावरुन हत्या (Murder)केल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमलराज नाडार या २६ वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. शनिवारी पहाटे विमलराजचे शेजाऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले, 


शेजारी राहणारा आरोपी मल्लेश चितकांती आणि त्याचा मित्र मृताच्या घराबाहेर मोठमोठ्याने बोलत असल्याने विमलराजची झोप उडाली. आरोपी मलेश चितकांती मृत विमलराज नाडर धारावीतील ९० फूट रोडवरील कामराज चाळमध्ये राहत होते.


या प्रकरणी धारावी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन जणांना अटक केली आहे. पण या दोघांव्यतिरिक्त आणखी काही जण यामध्ये सामील होते असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
मृताच्या नातेवाईकांनी इतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी धारावी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. आरोपींना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेताला.


यानंतर भाजप आमदार तामिळ सेलव्हन यांनी मध्यस्थी केली. पोलीस उपायुक्त यांच्याशी बातचीत करून इतर आरोपी पकडून त्यांच्यावरही कारवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर स्थानिकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.


धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी सांगितले की, "दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते आणि त्यांच्यात सतत भांडणे होत होती. शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चितकांती हा त्याच्या मित्रासोबत विमलराज नाडरच्या घराजवळ बसला होता. दोघे जोरजोरात बोलत असताना नाडरला जाग आली. तो घरातून बाहेर आला आणि त्यांना ओरडून निघून जाण्यास सांगितले."


त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. चितकांतीचा मित्र आणि नाडरच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यांना थांबवावे लागले. यानंतर चितकांती निघून गेला.


त्यानंतर काही मिनिटांतच तो स्टंपसह परतला आणि त्याने नाडरच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मारला. नाडर जमिनीवर पडताच, चितकांती तेथून निघून गेला.  मृत विमलराज पहाटे 5 वाजेपर्यंत तेथेच पडून होता. स्थानिक रहिवाशांनी त्याला पाहिले आणि सायन रुग्णालयात दाखल केले. 



रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. "आम्हाला रुग्णालयाकडून कळवण्यात आले. त्यानंतर आम्ही हत्येचा गुन्हा नोंदवला आणि गुन्हेगाराचा शोध सुरू केला," असे कांदळगावकर म्हणाले.


पोलिसांनी त्यानंतर चितकांतीच्या घरी एक पथक पाठवले. चितकांती कामावर गेल्याचा दावा त्याच्या भावाने केला. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा तो सापडला आणि त्याला पोलीस ठाण्यात नेले. यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली