कल्याण :  मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून  येथील नियम अधिक कठोर केले. आता कल्याण-डोंबिवलीकरांना फक्त अत्यावश्यक कामांसाठी घरा बाहेर पडता येणार आहे. आता येथील नागरिकांना भाजी आणण्यासाठी देखील घराबाहेर पडता येणार नसल्याचं पालिकेने सांगितले आहे. पालिकेने आता काउंटर सेलवर देखील बंदी आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यापुढे जीवनावश्यक वस्तू आणि किराणा दुकानांमध्ये काउंटर सेलवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या दुकांमध्ये होम डिलिव्हरीची सुविधा आहे त्याच दुकानदारांना फक्त  दुकानं उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 


यापूर्वी फक्त हॉटस्पॉटमध्ये हा नियम लागू होता, मात्र आता संपूर्ण महापालिका क्षेत्रात हा नियम लागू करण्यात आल्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांकडे घरा बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध  राहिलेला नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोणत्याही सामानाच्या खरेदीसाठी बाहेर न पडण्याचे आदेश महापालिकडून देण्यात आले आहेत.  


तर फळं आणि भाजी विक्रेत्यांनाही एकाच ठिकाणी बसण्यास मनाई करण्यात आली आहे. हातगाडीवर फिरता व्यवसाय करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. आता फक्त हातगाडीवरून फिरती भाजीविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना खरेदीसाठी घराबाहेर पडण्यास‌ पुर्णतः मनाई असणार आहे.