आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : पुणे ते मुंबईदरम्यान (Pune To Mumbai) धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये (sinhagad express) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला प्रवाशांची छेड काढून मोबाईलवर व्हिडीओ शूट करणाऱ्या माथेफिरुला कल्याण रेल्वे पोलिसांनी (kalyan railway police) ताब्यात घेतले आहे. हा प्रकार इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी या माथेफिरुला चांगलाच चोप दिला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ही व्यक्ती वारंवार असे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांनी टीसीच्या मदतीने छेड काढणाऱ्या व्यक्तीला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या सर्व प्रकारानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद अश्रफ असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसापासून तो असाच प्रकार करत असल्याचे प्रवाशाचे म्हणणे आहे. गुरुवारी देखील मोहम्मद अश्रफने पुन्हा असाच प्रकार केल्याचे इतर प्रवाशांच्या निदर्शनास आले. सिंहगड एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशांची छेड काढल्यानंतर अश्रफने व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. महिला प्रवाशांनी मोहम्मदकडे याबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 


महिला प्रवाशांनी मोहम्मद अश्रफने व्हिडिओ शूटिंग करत महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यामुळे प्रवाशांनी त्याला धरून चोप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर टीसीच्या मदतीने प्रवाशांनी त्याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रवाशांच्या तक्रारीनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरोधात तपास सुरु केला आहे. दरम्यान, दुसऱ्याच हेतूने मोहम्मद महिलांचे व्हिडीओ काढत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सकाळी मोहम्मद अश्रफ महिलांचे व्हिडीओ काढत असताना प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर प्रवाशांनी त्याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर मोहम्मद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे," अशी माहिती कल्याण लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.