कल्याण स्टेशन होणार स्मार्ट, सुरक्षेलाही प्रधान्य- मध्य रेल्वे
कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेमधील सर्वात महत्त्वपूर्ण स्थानकांपैकी एक आहे.
मुंबई : कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेमधील सर्वात महत्त्वपूर्ण स्थानकांपैकी एक आहे. मुंबईच्या उपनगरीय गाड्यांसोबत अनेक मेल-एक्सप्रेस देखील कल्याण स्थानकावरून धावत असतात. मध्य रेल्वेच्या या स्थानकावर रोज ५.६ प्रवाश्यांची वर्दळ असते. परंतु येथील सुरक्षा प्रवाश्याच्या तुलनेत कमी आहे. येत्या काळात कल्याण रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, कल्याण रेल्वे स्थानकात अपराधांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहेत. या अपराधांना नियंत्रणात आणण्यासाठी अधिक फौज तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकात फक्त दोन ठिकाणी डोर फ्रेम मेटल डिटेक्टर आहेत. या मशिनींमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकात ७९ मेटल डिटेक्टर मशिन लावण्यात येणार आहेत.
शिवाय कल्याण रेल्वे स्थानकात २१९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. हा विषय दिवसागणिक गंभीर होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे भरदिवसा होणाऱ्या अपराधांवर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा.
त्याचप्रमाणे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. लखोंच्या संख्येने या स्थानकावर प्रवासी ये-जा करत असतात. परंतु अशात अनेक वेळा मुलींसोबत या ठिकाणी गैरवर्तवणुकीच्या बातम्या समोर येत असतात. परिणामी याठिकणी सुरक्षा व्यवस्थेची फार गरज आहे. तर आता मध्य रेल्वे प्रवाश्यांना दिलेले आश्वासन कधी पूर्ण करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.