कमाल आर खानला मुंबई पोलिसांकडून अटक; म्हणतोय `जर मी मेलो तर समजून जा की...`
अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल आर खानला मुंबईत अटक करण्यात आली आहे. त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल आर खानला मुंबईत अटक करण्यात आली आहे. कमाल खाननेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. 2016 च्या एका प्रकरणात ही अटक करण्यात आली असल्याचा त्याचा दावा आहे. आपण दुबईला जात असताना मुंबई विमानतळावर बेड्या ठोकण्यात आल्याचं त्याने म्हटलं आहे.
कमाल आर खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी गेल्या एक वर्षांपासून मुंबईत आहे. मी कोर्टातील प्रत्येक तारखेला नियमितपणे हजेरी लावत आहे. आज मी नवं वर्षं साजरं करण्यासाठी दुबईला निघालो होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर अटक केली. पोलिसांच्या मते, मी 2016 च्या प्रकरणात वाँटेड आहे. सलमान खानने माझ्यामुळे टायगर 3 फ्लॉप झाल्याचा आरोप केला आहे. जर मी पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये कोणत्याही स्थितीत मृत्यूमुखी झालो तर ही हत्या आहे हे तुम्ही समजून घ्या तसंच यासाठी कोण जबाबदार असेल हेदेखील तुम्हाला माहिती आहे".
कमाल आर खानला यापूर्वी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. 2022 मध्ये त्याला दोनदा अटक करण्यात आली होती. पहिल्या वेळी त्याला दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल कथित वादग्रस्त ट्विट शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी, सप्टेंबरच्या सुरुवातीला, फिटनेस ट्रेनरवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
कमाल आर खान सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपट आणि सेलिब्रिटींवर नेहमी टीका करत असतो. आपल्या याच टीकांमुळे तो चर्चेत असतो. यामधून तो अनेक दावेही करत असतो. त्याने काही भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय बिग बॉस सीझन 3 मध्ये तो झळकला होता.