स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे राम मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तर देशभरातील काही लोकांना निमंत्रण पत्रेही पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह 11 दाम्पत्य पूजेत सहभागी होणार आहेत. महत्त्वाची या पूजेचा बहुमान महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांम्पत्याला मिळालाय. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्याना ही संधी मिळाली आहे. या 11 जोडप्यांमध्ये नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. 


विठ्ठल कांबळे हे कारसेवक आहेत. विठ्ठल कांबळे हे 1992 ला जेव्हा बाबरी मशीद पडली आणि रामाची मूर्ती तेथे ठेवण्यात आली तेव्हा उपस्थित होते. विठ्ठल कांबळे हे पेशाने मुख्याध्यापक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह म्हणून काम पहात आहेत. या कार्यक्रमासाठी महत्वाच्या व्यक्तींची नावे पाठवण्याचे काम विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती. परंतु त्यांनाच आमंत्रण आल्याने जन्माचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी दिली आहे. कांबळे यांच्या पत्नीने या पूजेसाठी खास पैठणी घेतली आहे. दुसरीकडे निमंत्रण आल्यानंतर कांबळे यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.


22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून 4000 हून अधिक साधू-मुनी अयोध्या शहरात पोहोचणार आहेत. अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेकाला आता तीन दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत राम लल्लाचा अभिषेक करणाऱ्या 11 दाम्पत्यांनी 15 जानेवारीपासून नियमांचे पालन सुरु केलं आहे. या नियमांचे पालन केल्यावरच निमंत्रित जोडपी हा धार्मिक विधी पूर्ण करण्यास पात्र ठरतील. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या प्राणाचा अभिषेक होईल, त्यानंतरच जोडप्यांचा संकल्प आणि विधीही पूर्ण होतील.


दरम्यान, राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभ मुहूर्त आला आहे. 84 सेकंदांच्या अभिजीत मुहूर्तावर रामलल्लांचा होईल. यावेळी, 11 जोडपी सर्व सनातनी आणि वैदिक परंपरांचे पालन करतील.