कांद्याचे आजचे दर जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
जाणून घ्या कांद्याचा मुंबईतील दर
मुंबई : देशभरात कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. कांद्याचे दर ८० रुपयांवर पोहचले आहेत. मुंबईत आज कांद्याचा दर ७० ते ८० रुपये प्रति किलो इतका आहे.
गेल्या काही दिवसांतच कांद्याचे दर गगनाला भिडले. कांद्याच्या दरात अचानक झालेल्या वाढीने सर्वच जण हैराण आहेत. मुंबईतच नाही तर देशातील अनेक शहरांत कांद्याचे दर वाढले आहेत. दिल्लीत कांद्याचा दर ८० रुपये किलो, गुरुग्राम ८० रुपये किलो, पटनामध्ये जवळपास ७० रुपये किलो, कोलकाता ७० ते ७५ रुपये किलो आणि चेन्नईत ६० रुपये किलो जवळपास कांद्याचा भाव आहे.
नाशिकमधील कांदा व्यापारांनी, सध्या कांद्याच्या दरात कोणतीही कपात होण्याची कोणतीही चिन्ह नसल्याचे म्हटले आहे. नाशिकमध्ये कांद्याचा घाऊक दर ४४०० प्रति क्विंटल इतका आहे.
अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आणि नवीन पीक तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने कांद्यांच्या किंमतीत वाढ होत आहे. आवक कमी झाल्याने कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापारांनी सांगितले आहे.