प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या कुर्ला इथल्या नाईक नगरातील चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्यकारक बचावलं कुटुंब
या भीषण दुर्घटनेत एक कुटुंब आश्चर्यकारकरित्या बचावलं आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतींत राहणारं बडीया कुटुंब देखील ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. नातेवाईक त्यांना फोन करत होते मात्र फोन लागत नव्हता. 


बडिया कुटुंबातील आई, वडिल आणि मुलगा हे कुर्ल्यातच आधी दुसऱ्या इमारतीत रहात होते. पण ती इमारत धोकादायक असल्याने ती पाडण्यात आली. त्यामुळे बडीया कुटुंब नुकतंच या इमारतीत रहायला आलं होतं. पण दुर्देवाने ही इमारत कोसळली आणि बडीया कुटुंब या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं.


मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केलं.  याच दरम्यान जवानांना ढिगाऱ्याखालून जिवंत व्यक्तीचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जवानांनी मदतकार्य सुरु केलं. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांननंतर जवानांनी प्रीत बडीया या तरुणाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. 


त्यानंतर काही वेळात प्रीतची आई देवकी आणि वडिलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  


बचाव कार्यात दोन कबुतरांना देखील जीवनदान मिळालं आहे. एनडीआरएफचे जवान ढिगारा बाजूला करताना त्यांना दोन जखमी कबुतर दिसली. त्यावर त्वरीत जवानांनी त्यांना बाहेर काढलं.


मुंबई इमारत दुर्घटनेला जवाबदार कोण ?
ही इमारत धोकादायक होती. सी 1 प्रवर्गातून सी 2 मध्ये इमारतीच्या राहिवाश्यांच्या मागणीने आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून बदल केला गेला होता. मात्र तरीही इमारत कोसळली त्यामुळे या इमारत कोसळण्याची जवाबदारी कोणाची हा प्रश्न कायम आहे