मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात गेल्या 24 तासात 258 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दिवसभरात दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील पोलीस दलात आतापर्यंत 16 हजार 401 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 13 हजार 446 पोलीस बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यातील पोलीस दलात 2,789 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात 166 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील कोरोनाची लागण होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.



दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाखांवर गेली आहे. त्यापैकी 6 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 25 हजार 964 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.