मुंबई : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये अपघात झालेल्या सी-९० या विमानाचं जुहूमधून आज घेतलेलं उड्डाण हे अखेरचं ठरलं. जुहूमधून उड्डाण करतानाचा या विमानाचा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला आहे. पवनहंस विमानतळावर त्याचं लँडिंग होणार होतं. प्रशिक्षणाच्या निमित्तानं या विमानानं उड्डाण केलं. या विमानाच्या उड्डाणाआधी विमानासमोर नारळ फोडण्यात आला, पेढे वाटण्यात आले. त्यानंतर या विमानानं उड्डाण केलं. आणि अवघ्या काही क्षणांतच हे विमान घाटकोपरमध्ये कोसळलं. सी ९० नावाचं हे विमान २३ वर्षे जुनं होतं. यामधले पायलटही अनुभवी होते, त्यांना पाच हजार तासांपेक्षाही जास्त काळ विमान उडवण्याचा अनुभव होता. को-पायलट मारियालाही फाल्कन विमान उडवण्याचा अनुभव होता, असं युवाय एव्हिएशनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय.या ब्लॅक बॉक्समुळे विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यास मदत होईल. ब्लॅकबॉक्समध्ये अपघाताआधी काही काळ कॉकपीटमध्ये झालेलं संभाषण मुद्रीत झालेलं असतं. वैमानिक आणि सहवैमानिक यांचं आपापसातलं संभाषण, वैमानिक आणि एटीसी यांच्यातलं संभाषण असं सगळ्याचं प्रकारचं संभाषण यात रेकॉर्ड होतं. त्यामुळे या संभाषणातून अपघाताच्या कारणाचा उलगडा होऊ शकतो.