मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शनिवारी ‘स्वरमाऊली’ सन्मानाने गौरविण्यात आले. मुंबईत लता मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ निवास्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अन्य मंगेशकर कुटुंबीय आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते. लतादीदींच्या 'प्रभुकुंज ' या निवासस्थानी त्यांना हा सन्मान प्रदान केला, तेव्हा लतादीदी खूप भारावून गेल्या 


 शंकराचार्यांच्या हस्ते लता मंगेशकर यांना 'स्वरमाऊली ' सन्मान प्रदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतरत्न लता मंगेशकर हे भारतातील अनेक आदरणीय आणि सन्माननीय गायिकांपैकी एक महत्वाचे नाव! लतादीदींनी आतापर्यन्त हजारो हिंदी चित्रपटांकरिता आणि छत्तीस पेक्षा अधिक भारतीय आणि विदेशी भाषांकरिता पार्श्वगायन केले आहे. त्याशिवाय आतापर्यंत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय  चित्रपट पुरस्कार ,बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे बारा वेळा विविध पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअरचे दोन विशेष पुरस्कार मिळाले असून, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार,दादासाहेब फाळके पुरस्कार, दि ऑफिसर ऑफ लीजन ऑफऑनर ( फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ) आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


लतादीदी भाराऊन गेल्या


१२ मे रोजी  कोल्हापूरच्या करवीर मठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी लता मंगेशकर यांची 'स्वरमाऊली ' या सन्मानासाठी निवड केली आणि लतादीदींच्या 'प्रभुकुंज ' या निवासस्थानी त्यांना हा सन्मान प्रदान केला ,तेव्हा लतादीदी खूप भारावून गेल्या . त्या नम्रपणे म्हणाल्या ,"आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे . यापूर्वी मी जगद्गुरू शंकराचार्यांना कोल्हापूर येथे भेटले होते  . त्यांनी मला 'स्वरभारती ' सन्मान बहाल केला होता. मला नेमके ते वर्ष आठवत नाही ,पण ही घटना मात्र नक्की आठवते . जगद्गुरू शंकराचार्यांनी 'स्वरमाऊली ' या आणखी एका महत्वाच्या सन्मानासाठी माझी निवड करणे हाच माझा खूप मोठा सन्मान आहे . या सन्मानासाठी माझे नाव त्यांच्या मनात आले ,त्यांनी हे सांगण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला आणि आज ते हा सन्मान प्रदान करण्यासाठी स्वतः येथे आले  आहेत ,यासाठी मी मला खूप भाग्यवान समजते . ही गोष्ट अशी नाही की जी तुम्हाला रोज मिळत असते . असे क्षण खूप महत्वाचे असतात .  मी त्यांच्या प्रति माझी कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांचे आशीर्वाद पाठीशी असूदेत अशी प्रार्थना करते."


आम्ही सर्व खरोखरच खूप कृतकृत्य झालो - हृदयनाथ


सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले,"ही एक परंपरा आहे आणि आम्हाला खरोखरच सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. शंकराचार्यांनी आमच्या वडिलांना 'संगीतरत्न ' सन्मानाने सन्मानित केले होते  आणि मला 'भावगंधर्व ' सन्मानाने गौरविले होते . आता त्यांनी लतादीदींना 'स्वरमाऊली ' सन्मानाने गौरविले आहे . हा दीदीला 'स्वरभारती ' सन्मानानंतर त्यांच्याकडून प्रदान केलेला दुसरा सन्मान आहे आणि आम्ही सर्व खरोखरच खूप कृतकृत्य झालो आहोत.