Salman Khan Security: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर समलान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईने घेतली आहे. यानंतर पोलिसांनी बिष्णोई गँगशी संबंधित शूटर्सला पकडण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी हरियाणाच्या पानीपत येथून सुक्खाला अटक केली होती. सुक्खाने 2022 मध्ये लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बरारच्या आदेशावर समलान खानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती. सलमान खानवर त्याला हल्ला करायचा होता. पण त्याचा प्लान फसला. दरम्यान त्याच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे झाले आहेत. 


गार्डशी केली होती मैत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेकी करण्यासाठी शूटर सुक्खाने पनवेल फार्म हाऊसच्या गार्डशी मैत्री केली होती. मुंबई पोलिसांनी जून 2024 मध्ये सलमान खान पनवेलमधील फार्म हाऊसच्या दिशेने जाताना त्याच्यावर हल्ला करण्याची योजना होती असा दावा केला आहे. पण ही योजना फसली होती. त्याआधी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या वांद्रे येथीस गॅलॅक्सी अपार्टमेंटवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. 


या गोळीबारानंतर सलमान खानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात बिष्णोई गँगवर शंका उपस्थित केली होती. सलमान खानने आपली आणि कुटुंबाची हत्या करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आल्याचं म्हटलं होतं. 


शूटर सुक्खा कसा पकडला गेला?


सुक्खाला हरियाणाच्या पानीपतमधून अटक करण्यात आली. पोलिसांना त्याच्या अटकेआधी एक टीप मिळाली होती. अशा स्थितीत मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. यानंतर मुंबई पोलीस पानीपतला पोहोचले होते. येथे पोलीस एका हॉटेलात थांबले होते. यादरम्यान पोलिसांना सुक्खादेखील याच हॉटेलात थांबला असल्याचं समजलं. यानंतर मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुक्खाला अटक केली. 


मद्यधुंद अवस्थेत होता सुक्खा


मुंबई पोलिसांनी जेव्हा सुक्खाला अटक केली तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि आपलं नावही नीट सांगू शकत नव्हता. ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी वाढवली होती. पण पोलीस रेकॉर्डमध्ये असणाऱ्या फोटोच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. 


चौकशीत सुक्खाने सांगितलं की, बिष्णोई टोळीचं नेटवर्क अनेक राज्यात पसरलं आहे. यासह त्याने सांगितलं की, एप्रिल महिन्यात त्यानेच दुसऱ्या शूटर्सच्या मदतीने सलमान खानवर फायरिंग केली. सुक्खाने शूटर्सला पिस्तूल मिळवून दिली होती.