मुंबई: सध्या सगळ्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली असतानाच महाराष्ट्रातील राजकीय पटलावर नव्या हालचाली घडताना दिसत आहेत. ७ जून रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ सदस्य असलेले शिवाजीराव देशमुख यांच्या निधानामुळे ही जागा रिक्त झाली होती. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना आपली ताकद आजमावून बघता येईल. विधानपरिषदेची एका जागेची पोटनिवडणुक जिंकणे भाजपाला सहज शक्य आहे. गेल्या सहा महिन्यांत एकुण पाच आमादारांनी राजीनामे दिले आहेत जे मंजूर झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विधानसभेतील सध्याचे संख्याबळ


भाजप - १२०
शिवसेना - ६१
काँग्रेस - ४२
राष्ट्रवादी - ४० 
बहुजन विकास आघाडी - ३
शेकाप - ३
एमआयएम -२ 
समाजवादी - १
रासप - १
कम्युन्सिट - १ 
अपक्ष - ७
नामनियुक्त - १
एक जागा रिक्त


हे संख्याबळ लक्षात घेता भाजपचाच उमेदवार निवडुन येणार हे निश्चित मानले जात आहे.


आता विधानपरिषदमध्ये भाजपाची एक जागा वाढल्याने युतीची ताकदही एकाने वाढत आहे. यामुळे सभापती आणि रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी निवडणुक होणार का, हा खरा प्रश्न आहे. तसेच सभापती भाजपकडे आणि उपसभापती शिवसेनेकडे असे वाटप होणार का, याकडेही सर्वांची नजर आहे.


विधानपरिषदेमधील सध्याचे संख्याबळ


राष्ट्रवादी काँग्रेस - १७
काँग्रेस - १६
भाजप - २२
शिवसेना - १२ 
लोकभारती - १
शेकाप - १
रासप - १
आरपीआय ( कवाडे ) - १
अपक्ष  - ७ 
एक जागा रिक्त



शिवसेना- भाजप ३४, रासप एक आणि नागो गाणार, किशोर दराडे, प्रशांत परिचारक हे तीन अपक्ष आमदार हे युतीकडे एकूण ३८ आमदारांचे संख्याबळ आहे. तर विरोधकांकडे काँग्रेस - राष्ट्रवादी ३३, लोकभारती-शेकाप-आरपीआय कवाडे गट प्रत्येकी एक आणि एक अपक्ष असे ३७ आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसची एक जागा रिक्त आहे जी भाजपाकडे जाणार आहे. तर दोन अपक्षांपैकी श्रीकांत देशपाडे हे स्वतंत्र भूमिका घेणारे असले तरी ते भाजपाला साथ देतील, असा भाजपचा दावा आहे. तर दत्तात्रय सावंत कोणाला साथ देणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.