महाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल कार्यालयाला १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र सोपवले आहे. भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजभवनात पत्र सोपवले. तसेच राज्यपाल सांगतील तेव्हा आपण सर्व १६२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यास तयार असल्याचे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
राज्यात निवडणुकीनंतर झाल्यानंतर युती तुटली आणि सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला. त्यानंतर भाजपने आमच्याकडे संख्याबळ नाही सांगत विरोधी बाकावर बसण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी विचारणा केली. मार्, २४ तासात त्यांना पाठिंबा असणाऱ्या आमदारांचे पत्र सादर करता आले नाही. त्यांनी वेळ वाढवून मागितला. मात्र, त्यांची मागणी राज्यपालांनी मान्य न करता राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. राष्ट्रवादीने शिवसेना - काँग्रेससोबत बोलणी करुन महाविकासआघीड स्थापन केली. आणि दुसऱ्या दिवशी राज्यपालांची भेट घेणार अशी शक्यता असताना शुक्रवारी एकाच रात्री सर्व यंत्रणा हलविण्यात आल्या आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सराकर शनिवारी सकाळी स्थापन झाले. त्यानंतर नवा पेच निर्माण झाला. राष्ट्रपती राजवट उठली तरी नवे सरकार पुढे आले नाही. त्यामुळे गोंधळात भर पडला.
नव्या सरकारवर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. असं काय घडलं की एका रात्रीत सरकार स्थापन करण्याची वेळ आली. बहुमत आमच्याकडे असताना भाजपला कशी संधी दिली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे आजही पुरेसे संख्याबळ नसल्याने बहूमत सिद्ध करु शकणारच नाहीत. भाजप असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, पत्रावर राष्ट्रवादीच्या ५१ आमदारांच्या सह्या असून ५४ पैकी ५३ आमदारांचे समर्थन असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही वेळ वाढवून मागितली असतानाही आमची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली, तसेच लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली. संख्याबळ असते तर दिवसाढवळ्या उजळ माथ्याने शपथ घ्यायला हवी होती, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.