कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : तुम्ही वेळच्या वेळी खाताय का? रोज थोडं तरी चालताय का? तुमच्या कुटुंबीयांशी दिवसातला थोडा वेळ काढून बोलताय का? की जगण्याच्या धावपळीत हे सगळं विसरुन गेलात? तसं असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे... मुंबईकरांबद्दल एक गंभीर वास्तव समोर आलंय.


हर शक्स परेशाँनसा क्यूं है...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस शहर में हर शक्स परेशाँनसा क्यूं है... हृषिकेश मुखर्जींच्या गबन या १९६६ साली आलेल्या सिनेमातलं हे गाणं... त्याला आता पन्नास वर्षं उलटून गेली. पण, या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही. उलट मुंबईकराची अस्वस्थता गेल्या पन्नास वर्षांत वाढतच गेली. मुंबई महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणातच ही बाब प्रकर्षानं समोर आलीय. कारण, मुंबईतल्या रुग्णांना जे आजार होतात, त्यात सर्वाधिक प्रमाण हे जीवनशैलीशी निगडीत आजारांचं आहे.


मुंबईत सर्वाधिक रुग्ण मनोविकाराचे आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्ण नैराश्य, अतिचिंता, व्यसनाधीनता, शाळकरी मुलांमध्ये अतिचंचलता याचं प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचे रुग्ण आहेत. या सर्वेक्षणासाठी तब्बल ७३ लाख रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. 


काय सांगतेय संख्या... 


- मुंबईतले ३१.१४ टक्के रुग्ण हे मनोविकारांचे आहेत
- तर २३.२२ टक्के रुग्णांना मधुमेह आहे
- २२.७८ टक्के रक्तदाबाचे रुग्ण आहेत
- विशेष म्हणजे श्वान किंवा प्राणी दंश झालेल्या रुग्णांची संख्या ही हृदयविकाराच्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ९.९५ टक्के इतकी आहे
- तर मुंबईत हदयविकार असलेल्या रुग्णांची संख्या ७.४९ टक्के इतकी आहे


बेशिस्तीचं आयुष्य


मुंबईतली धावपळ आणि बेशिस्त आयुष्य या सगळ्यांमुळेच मुंबईकरांमध्ये हे 'लाईफ स्टाईल डिसीज' अर्थात जगण्याशी निगडित रोगांचं प्रमाण वाढतंय... हे रोग टाळण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपायही डॉक्टरांनी सुचवलेत...


काय करता येईल


नियमित चालणं, योगाभ्यास, नियमित आणि वेळच्या वेळी आहार, प्रमाणात साखर आणि मीठ, फास्ट फूड आणि तळलेल्या पदार्थांचं नियंत्रित प्रमाण, रोजच्या जेवणात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. महत्त्वाचं म्हणजे, कुटुंबीयांसाठी राखीव वेळ ठेवा, एखादा छंद जोपासा, दिवसातून काही मिनीटं संगीत ऐका, ध्यानधारणा करा


मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात हे सगळे उपाय करणं थोडं कठीण असेलही... पण सर सलामत तो पगडी पचास... त्यामुळे मुंबईकरांनो, थोडा वेळ स्वतःसाठी द्या, आयुष्याला थोडी शिस्त लावण्याचा मनापासून प्रयत्न करा...