मुंबई : मंत्रालयाच्या तळमजल्यावर दारूच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राज्याचा कारभार जिथून चालवला जातो तिथली सुरक्षा भेदून या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. तसंच मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही यांमुळे गंभीर प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत. मंत्रालयातील उपहारगृहाच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा ढिगारा सापडला. 'झी 24तास'ने बातमी दाखवल्यानंतर दारुच्या बाटल्या उचलण्यात आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.



भाजपची राज्य सरकारवर टीका


मंत्रालयाद दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ही बाब दुर्देवी आणि शरम आणणारी आहे, असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? आघाडी सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसंच यासंदर्भात त्यांनी मु्ख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलं आहे.
याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत हे पत्र लिहिण्यात आलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्राची दखल घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



मंत्रालयाला वाली नाही


दरम्यान, या प्रकरणावरुन मनसेनेही राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मंत्रालयाला वाली नाही, मंत्रालय ओस पडलं आहे, आवो जावो घर तुम्हाला अशी सध्या मंत्रालयात परिस्थिती आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. बाहेरची रेस्टॉरंट बंद आहेत, आता मंत्रालयात रेस्टोरंट सुरु झालं आहे अशी खोचक टीकाही संदीप देशपांडे यांनी केली आहे.