मुंबईत दारुची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी
अन्य दुकाने सुरु करण्याबाबतही नवा आदेश
दीपक भातुसे, मुंबई : मुंबईत आता दारुची होम डिलिव्हरी मिळू शकणार आहे. कारण मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मुंबईत दारुची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज काढले आहेत. त्यामुळे मुंबईत कंटेन्मेंट झोन वगळता शनिवारपासून घरपोच दारु उपलब्ध होईल. त्याबरोबर दारुव्यतिरिक्त अन्य दुकाने काही निर्बंध घालून सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.
मुंबईत दारुची दुकाने सुरु करण्यास मात्र परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबईतील दारुची दुकाने एवढ्यात उघडणार नाहीत. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये दारुविक्री करण्यासही महापालिकेने परवानगी दिलेली नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात दारुविक्री बंद करण्यात आली होती. याआधी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीला परवानगी दिल्यानंतर मुंबईतही दारु खरेदीसाठी दारु दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. राज्यभरातच असे प्रकार घडले होते. त्यानंतर सरकारवर मोठी टीकाही झाली होती. त्यामुळे दारु विक्री बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
अन्य दुकानांबाबत काय निर्णय?
मुंबईत मॉल्स, मार्केट बंदच राहणार आहेत. अत्यावश्यक दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आधीच देण्यात आली असली तरी आता त्याबरोबरच एका रस्त्यावर अन्य पाच दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तुंच्या दुकानांबरोबरच अन्य प्रकारची काही दुकाने सुरु होतील. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र अशी दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
लॉकडाऊन ४ सुरु झाल्यानंतर स्थानिक प्रशासनांनी दारु दुकाने सुरु करण्याबाबत निर्णय घेतले आहेत. मुंबईत मात्र अजून दारुविक्रीबाबत कोणताही निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला नव्हता. आज महापालिका आयुक्तांनी मुंबईत दारु घरपोच देण्यास दारुविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे दारु शौकिनांना दारु घरीच उपलब्ध होणार आहे.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दारुविक्रीबाबत काढलेल्या आदेशात पुढील मुद्दे नमूद केले आहेत.
- दारु दुकानांमध्ये दारु विक्रीस परवानगी दिलेली नाही.
- होम डिलिव्हरी करण्यासाठी दारु दुकानदार ई-कॉमर्स पद्धतीचा वापर करू शकतील.
- राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क खात्याने काढलेल्या नियमावलीचं पालन केलं जावं.
- याबाबत काढलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे याची खबरदारी संबंधित विभागाचे उत्पादन शुल्क अधिकारी आणि वॉर्ड ऑफिसर घेतील.
आयुक्तांनी काढलेल्या या आदेशामुळे मुंबईतील कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणी घरपोच दारु मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.