मुंबई : लॉकडाऊन सुरू होऊन बरेच दिवस झाले. मजुरांची या परिस्थितीत गैरसोय होत आहे. आपल्या घराचं ओढीनं हे मजुर मैलोनमैल प्रवास करत आहेत. त्यांचा पायी प्रवास हा सगळ्यांनाच अस्वस्थ करणारा आहे. घराकडे निघालेल्या १६ मजुरांचा औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना प्रत्येकालाच चटका लावून गेली. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या मजुरांसाठी एक दिलासादायक बातमी. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. मुंबईत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरीत मजुरांसाठी विशेष ट्रेन उपलब्ध करण्याची विनंती केली. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून पीयूष गोअल यांनी तात्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला आहे. मुंबईतून १० विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 


मुंबईवरून उत्तर प्रदेशसाठी गाड्या सोडण्यात येणार असल्या तरी, यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही ज्यांना प्रवासाची परवानगी मिळाली आहे, त्यांनाच ट्रेनने प्रवास करता येणार आहे. स्टेशनवरची गर्दी टाळण्यासाठी सरकारने नोंदणीची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.


लॉकडाऊन वाढत असल्यामुळे अनेक परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. पण काही राज्यांचे मुख्यमंत्री या मजुरांना घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मजुरांना न स्वीकारणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.


परप्रांतीय मजुरांच्या प्रश्नावर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या मजुरांच्या प्रवासासाठी एसटी बस उपलब्ध करून देऊ, असं सांगितलं. तसंच रेल्वे मंत्र्यांनीही या मजुरांच्या प्रवासासाठी रेल्वेची सोय करून देऊ, असं सांगितल्याचं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.