संजय राऊत म्हणतात, साध्वी प्रज्ञाची पीडा समजून घ्यायला हवी
एकीकडे शहीदांना मानवंदना द्यायची, सैनिकांचा गौरव करायचा आणि दुसरीकडे बॉम्बस्फोटातल्या आरोपीला उमेदवारी द्यायची, हा दुटप्पीपणा शोभतो का?
मुंबई : शहीद हेमंत करकरेंवर संतापजनक भाषेत टीका करून देशभरातून रोष ओढवून घेतलेल्या साध्वी प्रज्ञासिंग यांचं भाजपा आणि शिवसेनेनं समर्थन केलंय. व्यक्तीगत त्रास झाल्यामुळं प्रज्ञासिंग तसं बोलल्याचा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलाय... तर साध्वी प्रज्ञासिंग यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 'ज्याप्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली... ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वीची भावना-पीडा तुम्ही समजून घ्यायला हवी... ठिक आहे, २६/११ च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्यांचं नाव नेहमीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीत चर्चेत राहिलं... परंतु, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याची किंमत चुकवावी लागली' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलीय.
साध्वी प्रज्ञा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी
भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक आणि अत्यंत बेजबाबदार विधान केलंय. शहीद हेमंत करकरेंबद्दल त्या जे काही बोलल्या त्यामुळे देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा तिळपापड झालाय. 'हेमंत करकरेना आपल्या कर्माची फळं मिळाली... दहशतवाद्यांनी जेव्हा करकरेला ठार केलं तेव्हा माझं सुतक संपलं' अशा शब्दांत साध्वीनं आपल्या मनातला द्वेष उघड केला. मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी निधड्या छातीनं भिडलेल्या आणि शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दलचे हे प्रज्ञासिंह ठाकूरचे संतापजनक उद्गार... साध्वी प्रज्ञासिंह मालेगाव बॉम्बस्फोटातली आरोपी आहे सध्या जामिनावर सुटलीय.
शहीद हेमंत करकरे
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास तत्कालीन एटीएसप्रमुख हेमंत करकरे करत होते. हेमंत करकरेंनीच मालेगाव बॉम्बस्फोटाचा छडा लावत प्रज्ञासिंह आणि तिच्या साथीदारांना अटक केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटाचं प्रकरण उजेडात येऊन जेमतेम दोन महिनेही झाले होते तोच २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला... त्यावेळी कामा रुग्णालय आवारात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हेमंत करकरे शहीद झाले. त्यांचा मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मान करण्यात आला. एटीएस प्रमुखपदाआधी हेमंत करकरेंनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त आणि रॉमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भाजपा या प्रश्नांची उत्तरं देणार का?
अशा हेमंत करकरेंबद्दल संतापजनक विधान केल्यानं प्रज्ञासिंहवर जोरदार टीका होतेय. एकीकडे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला म्हणून बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचं पंतप्रधान मोदी सांगतात... आणि दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंहसारख्या दहशतवादाच्या खटल्यातील आरोपीला उमेदवारी दिली जाते... एकीकडे शहीदांना मानवंदना द्यायची, सैनिकांचा गौरव करायचा आणि दुसरीकडे बॉम्बस्फोटातल्या आरोपीला उमेदवारी द्यायची, हा दुटप्पीपणा शोभतो का? शहीदांचा हा अपमान भाजपा कशी काय खपवून घेते? हे असले लोकप्रतिनिधी देशाचं भवितव्य कसं ठरवू शकतील? बेजबाबदार आणि संतापजनक विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहची उमेदवारी भाजपा रद्द करणार का?
या प्रश्नांची उत्तरं भाजपा नेत्यांना द्यावीच लागतील... कुठला इतिहास आपण देशासमोर लिहितोय, याचं भान 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्यांना बाळगावंच लागेल.