Lok Sabha Election 2024 : ठाणे... मुंबईच्या शेजारचं महत्त्वाचं शहर... तलावांचं शहर ही ठाण्याची ओळख... तब्बल 35 तलाव ठाण्यात आहेत. मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, येऊरचं जंगल, कोपनेश्वर मंदिर, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पेशवेकालीन विठ्ठल मंदिर हे इथले महत्वाचे लँडमार्क... 1853 साली मुंबईतलं बोरिबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे भारतात धावली. मात्र इथले रेल्वेचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. ठाणे हा अनेक वर्षांपासूनचा शिवसेनेचा राजकीय बालेकिल्ला... शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं पक्षाचं ब्रीदवाक्यच होतं. आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेना रुजवली, वाढवली सुद्धा... त्यामुळे आता ठाण्याची निवडणूक रंजक होणार हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्याचे प्रश्न काय?


लांब पल्ल्याच्या गाड्या ठाण्यात थांबत नाहीत. रेल्वे स्थानक नुतनीकरण आणि विस्तारीत रेल्वेस्थानकांचं काम रखडलंय. ठाण्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण झालेलं नाही. ठाणेकर मुख्यमंत्री असूनही बेरोजगारी वाढलीय. अनधिकृत बांधकामांचं पेवच फुटलं. वाहतूक कोंडीत ठाणेकरांचा श्वास गुदमरतोय.


ठाण्याचं राजकीय गणित 


2009 मध्ये राष्ट्रवादीचे डॉ. संजीव नाईक यांनी शिवसेनेचे विजय चौगुले यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेनेनं पुन्हा ठाणे जिंकलं. राजन विचारेंनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांना हरवलं. 2019 मध्ये राजन विचारे दुस-यांदा खासदार झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंची पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि अपक्ष 1 आमदार आहे.


शिवसेना ठाकरे गटानं यंदा तिसऱ्यांदा राजन विचारेंना मैदानात उतरवलंय. यावेळी शिवसेनेत फूट पडली असल्यानं राजन विचारेंना चांगलाच घाम गाळावा लागणाराय. दुसरीकडं ठाणे म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड... मात्र अजूनही शिंदेंना उमेदवार ठरवता आलेला नाही. माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांची नवं चर्चेत आहे. दुसरीकडं भाजपनंही ठाण्यावर दावा सांगितलाय. भाजपकडून संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर यांची नावं आघाडीवर आहेत. ठाण्यातून १९८९ आणि १९९१ साली भाजपचे राम कापसे खासदार झाले होते. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं भाजपकडून हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला.  आता पुन्हा एकदा भाजपनं ठाण्यासाठी जोर लावलाय. ठाण्यातून नेमकं कोण लढणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ठाण्याची जागा प्रतिष्ठेची आहे. केवळ जागा पदरात पाडून घेणं, एवढंच नाही. तर ती जिंकणं देखील तेवढंच महत्वाचं असणाराय. त्यामुळंच प्रत्यक्ष उमेदवार कुणीही असो, लढत कुणाचीही होवो... हार-जीत मुख्यमंत्री शिंदेंची होणार आहे.