पक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...`या` पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मग इच्छुकांची भाऊगर्दी सुरु झाली. कोणाला तिकीट मिळालं तर कोणाला मिळालं नाही. मग नाराजांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. त्यांचं नशीबचं खुललं. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या घेतल्या. एवढंच नाही तर थेट लोकसभेचं तिकीटच (Loksabah Election 2023) मिळालं.
या नेत्यांना उमेदवारी
निलेश लंके - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या लंकेंनी तुतारी फुंकत शरद पवार गटात प्रवेश केलं. त्यांना थेट अहमदनगरमधून तिकीट मिळालं...
चंद्रहार पाटील - फेब्रुवारी 2024 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या चंद्रहार यांनी मार्च 2024 मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला, आणि थेट सांगलीतून उमेदवारी मिळवली..
धैर्यशिल मोहिते पाटील - भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि माढ्यातून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं
राजू पारवे - काँग्रेसमधून आमदार राजू पारवेंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली.
अर्चना पाटील - धाराशिवची जागा अजित पवार गटाला सुटली. तेव्हा अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि धाराशीवमधून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं.
शिवाजीराव आढळराव पाटील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि माजी खासदार आढळराव पाटील यांनी हातात घड्याळ बांधलं आणि शिरुरमधून त्यांना उमेदवारी मिळाली.
करण पवार - जळगावमधून भाजपला रामराम करत करण पवार यांनी उन्मेष पाटील यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांना जळगावचं तिकीट मिळालं.
बजरंग सोनवणे - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत बजरंग सोनवणेंनी शरद पवारांना साथ दिली. आणि बीडमधून थेट पंकजा मुंडेंविरोधात शरद पवारांच्या पक्षाकडून तिकीट मिळवलं.
वसंत मोरे - पुण्यातले फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी लोकसभेसाठी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली.
तिकीट मिळालं नाही किंवा मिळणार नाही हे समजल्यावर अनेकांनी पक्षांतर केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग जोरात सुरु आहे. पण या सर्वात पक्षात असलेल्या निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशाच येतेय.