Loksabha 2024 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केलं. पण हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तान सारखी परिस्थीती होऊ देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवू. भाजपा, आरएसएस आणि नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले तरी ते संविधानाला हात लावू शकणार नाहीत, बदलू शकणार नाहीत आणि तसे प्रयत्न केले तर भाजपाचे (BJP) नामोनिशान राहणार नाही, अशा इशारा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खर्गेंचा मोदींवर हल्लाबोल
बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेत खर्गे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नेहमी प्रश्न विचारतात की, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने लोकशाही आणि संविधान वाचवलं नसतं तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते. मोदींची गॅरंटी खोटं बोलणं आहे. 15 लाख रुपये देणार, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु असं म्हणाले. पण मोदींनी यातलं काहीही केलं नाही. काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर तुमच्या दोन एकर जमिनीतून तर एक एकर जमीन मुस्लीमांना देतील, दोन म्हशी असतील तर त्यातील एक म्हैस मुस्लीमांना देतील ही पंतप्रधानाची भाषा आहे का? ज्या दिवशी मुस्लीमांच्या विरोधात बोलेन त्या दिवशी सार्वजनिक जिवनातून निवृत्त होईन म्हणाले आणि दुसऱ्याच दिवशी हिंदू मुस्लीमवरच बोलले. नरेंद्र मोदी एससी, एसटी, मागास समाजाला काहीही देऊ इच्छित नाहीत. 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदींनी जागा भरल्या नाहीत. महागाई, बेरोजगारीवर बोलत नाहीत. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत तर इंडिया आघाडी 300 जागा जिंकून सत्तेत येईल असा विश्वासही खर्गे यांनी व्यक्त केला.  


शरद पवारांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यावेळी पीएम मोदी यांना इशारा दिला. नरेंद्र मोदी यांनी विचाराने सोबत नसलेल्यांना जेलमध्ये टाकलं आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना मोदींनी जेलमध्ये टाकलं. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना कठीणवेळी मदत केली त्याचा त्यांना विसर पडला आहे. यावेळची लढाई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची आहे. भटकती आत्मा अशी टीका केलेल्या नरेंद्र मोदींना सडतोड उत्तर देत शरद पवार म्हणाले की, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही.


उद्धव ठाकरे यांचं आव्हान
तर महाराष्ट्र हा शाहु, फुले, आंबेडकरांचा आहे, तो मोदी-शाह यांचा होऊ देणार नाही, असं  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  भाजपाने 400 पारचा नारा दिला, आपण अब की बार भाजपा तडीपार चा नारा दिला आणि मग भाजपा गप्प झाले, त्यानंतर त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा काढला. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडले त्याच रस्त्यावरून नरेंद्र मोदींनी वाजत गाजत रोड शो केला .शिवसेनेने भाजपाला कठीण काळात मदत केली त्या शिवसेनेला नकली म्हणता. 10 वर्षात मोदींनी काय केलं, प्रचारात ते सारखे हिंदू मुस्लीम, हिंदू मुस्लीम करत आहेत. कधी घुसखोर म्हणता, देशद्रोही ठरवता. देशाचे स्वातंत्र अबाधित ठेवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. ज्या प्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर करुन त्या रात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे संपवल्या तसंच नरेंद्र मोदी हे शेवटचे मुंबईत आले आहेत, 4 तारखेला संपूर्ण देश डिमोदीनेशन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.


'देश हुकूनशाहीकडे चाललाय'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या सभेत पीएम मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान देशाला हुकूमशाही कडे घेऊन जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचा नरेंद्र मोदी सामना करु शकत नाहीत, हरवू शकत नाही म्हणून खोटी तक्रार करुन जेलमध्ये टाकलं. गरीब मुलांना चांगले शिक्षण आणि आरोग्याची सुविधा उपलब्ध केली हेच मोदींना नको आहे त्यासाठीच मला अटक करण्यात आली. 2 तारखेला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. पण इंडिया आघाडीचे सरकार आले तर मात्र जेलमध्ये जावे लागणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकले किंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही तेच चालले आहे. पाकिस्तानतही तेच चालले आहे, मोदी सुद्धा भारताला पाकिस्तान, बांग्लादेश बनवू पहात आहेत. मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, शरद पवार प्रियंका गांधी सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकले जाईल, अशी भिती केजरीवाल यांनी व्यक्त केली.  
 
या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.