Loksabha 2024 : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray). महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारे चुलतबंधू. एक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, तर दुसरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेला शिवसेना पक्ष वारसाहक्कानं उद्धव ठाकरेंकडं आला. एकनाथ शिदेंच्या बंडांमुळं एका शिवसेनेचे दोन पक्ष झालेत. शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदेंकडे गेला. तर ठाकरेंच्या हाती मशाल आली. दुसरीकडं शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा राजकीय पक्ष रुजवला. इंजिन ही मनसेची निशाणी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंची हाताला साथ
मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी या दोघाही ठाकरे बंधूंची विचित्र राजकीय कोंडी होणाराय. कारण त्यांचं पक्ष आणि चिन्हं वेगळं आणि मतदान दुसऱ्यालाच करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. उद्धव ठाकरेंचा मातोश्री बंगला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) इथून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यामुळं उद्धव, रश्मी, आदित्य आणि तेजस हे ठाकरे कुटुंब यंदा हाताला साथ देणार आहे. वर्षा गायकवाडांनी ठाकरेंची भेट घेतली, तेव्हा खुद्द ठाकरेंनीच ही ग्वाही दिली.


वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा गायकवाड जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला तसंच उद्धव ठाकरेंनी माझं मत वर्षा गायकवाड यांनाच असल्याचंही म्हटलंय.


राज्य ठाकरेंचं धनुष्यबाणाला मत
राज ठाकरेंचीही अवस्था काही वेगळी नाही. राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. इथून विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळं 2004 नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत राज, शर्मिला, अमित असं ठाकरे कुटुंब चक्क धनुष्य बाणाला मतदान करणार आहे. 


या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे केवळ मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. तसंच मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी सागितलं होतं.


महायुती आणि महाविकास आघाडी अशी महाराष्ट्रात राजकीय भेळ झालीय. नक्की कुणाला मतदान करायचं या विचारानं सामान्य मतदार पुरता गोंधळून गेलाय. तर दुसरीकडं ठाकरेंसारख्या बड्या राजकीय नेत्यांचीही अवस्था कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा अशी झालीय.